शेतीत देखील होईल आता हायटेक टेक्नॉलॉजीचा वापर!

आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा शिरकाव झाला असून त्याला कृषी क्षेत्र देखील अपवाद नाही. कृषी क्षेत्रामध्ये आता प्रत्येक कामाकरिता यंत्रांचा वापर होऊ लागला आहेच परंतु नवनवीन पिकपद्धती, सिंचनाच्या सुविधांबाबत आलेले तंत्रज्ञान, ड्रोन सारखे तंत्रज्ञान तसेच पिकांच्या उत्पादन वाढीसाठी आवश्यक असणारे महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान असे अनेक प्रकारच्या तंत्रज्ञानाने आता कृषी क्षेत्रामध्ये शिरकाव केलेला आहे.

या सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणजे शेतकरी आता भरगोस असे उत्पादन मिळवू लागले आहेतच व असे तंत्रज्ञान व यंत्राच्या वापरामुळे शेतीमधील कष्ट देखील कमी झालेले आहेत व वेळेत देखील बचत झालेली आहे. परंतु आता याही पुढे जात कृषी क्षेत्र आता एका नवीन तंत्रज्ञानाच्या पर्वामध्ये पाऊल ठेवत आहे

असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाची सर्वत्र जगभरात चर्चा सुरू आहे व या माध्यमातून विविध क्षेत्रांमध्ये अनेक प्रकारचे प्रयोग केले जात आहेत. व याच पद्धतीचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर आता कृषी क्षेत्रात देखील करण्यात आला आहे.

 कृषी क्षेत्रामध्ये आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बारामती जिल्ह्यामध्ये या आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाच्या मदतीने पिकांचे उत्पादन घेण्यात आले आहे व महत्त्वाचे म्हणजे बारामतीत पहिल्यांदाच शेतामध्ये असा प्रयोग करण्यात आला व तो यशस्वी झाल्याची माहिती देखील समोर आली आहे.

या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या  मदतीने भेंडी, टोमॅटो तसेच टरबूज, मिरची, भोपळा तसेच कोबी व प्रमुख म्हणजे ऊस या तंत्रज्ञानाने बारामती जिल्ह्यामध्ये घेण्यात आलेली आहेत. विशेष म्हणजे या सर्व पिकांचे जे काही महत्त्वाचे नियोजन आहे ते या कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स ने केले आहे.

जर आपण याबाबत कृषी विज्ञान केंद्राची तज्ञ तुषार जाधव यांचे मत पाहिले तर त्यांच्यामते पहिल्यांदाच विविध प्रकारच्या पिकांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून यामध्ये विविध प्रकारचे सेन्सर आहेत व या सेंन्सरच्या मदतीने आपल्याला पिकांबद्दल अधिक ची माहिती जाणून घेण्यास मदत होते.

प्रामुख्याने यामध्ये मातीमधील नायट्रोजन, फॉस्फरस, हवेचे तापमान, वाऱ्याचा वेग आणि हवेतील आद्रता मोजण्यासाठी  व हवेतील रोगांचे सूक्ष्म निरीक्षण करण्यासाठी यामध्ये सेन्सर आहेत. या सेन्सर प्रणालीच्या माध्यमातून पाण्याचे मोजमाप तसेच मातीची क्षारता तपासणी करण्याचे महत्त्वपूर्ण काम देखील केले जाते.

तसेच या प्रणालीच्या माध्यमातून पिकांवर परिणाम करणारी जमिनीची जी काही विद्युत चालकता असते ती देखील तपासले जाते. प्रत्येक अर्धा तासाने ही यंत्रणा जमिनीच्या बाहेर आणि हवेत, जमिनीवर घडणाऱ्या सर्व घटनांची माहिती या सेन्सरच्या माध्यमातून उपग्रहाकडे जाते व उपग्रहाच्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या असलेल्या संगणकावर ते पाठवते व यावर या संबंधित सिस्टम शेतकऱ्याला पुरेशी माहिती देते.

एआय टेक्नॉलॉजीच्या मदतीने आता शेतकऱ्यांना जमिनीला किती पाणी द्यावे किंवा किती खत द्यावे? खते द्यावी तर ती कोणत्या प्रकारची द्यावीत इत्यादी माहिती मिळण्यास मदत होत आहे. त्यामुळे येणाऱ्या कालावधीत या टेक्नॉलॉजीमुळे शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन मिळण्यास मदत होईल हे मात्र निश्चित.